खार नारंगी हे अलिबाग मधील एक छोटेसे गाव, गावातील लोकसंख्या साधारण ९०० ते ९५० आहे. खार नारंगी हे नाव शिवकाळापासून वाचण्यात आले आहे. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी महाराज यांना छत्रपती श्री राजाराम महाराज यांनी मौजे खार-नारंगी, चेउल, कोसलवाडी व चिंचोली ही गावे इनाम असल्याचा उल्लेख इ.स १६९८ च्या सनदेमध्ये आहे. ही गावे इ.स १६९८ च्या आधीपासून श्री मोरया गोसावी महाराजांना इनाम आहेत.
गावाचा इतिहास सांगायचा म्हणजे या गावांमध्ये १८ जातीची पगड आहे. नारंगी गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर श्रीभुवनेश्वराचे मंदिर आहे. तेथे वीरगळ देखील आहे.
नारंगी गावचा बराचसा भूभाग हा श्री वैद्य यांच्या मालकीचा होता, तो त्यांनी तपस्वी श्री मोरया गोसावी महाराजांना इनाम दिला आहे. त्यामुळे पूर्वी नारंगी गावाला मोरया गोसाव्यांचे गाव असेही म्हटले जायचे.
गावच्या लगतची चारही बाजूची शेती अतिशय सुपीक आहे, बारमाही वाहणारा ओढा आहे. त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भात शेती जास्त प्रमाणात होत असे, त्यामुळे श्री मोरया गोसावी यांच्याकडून खंडाने शेती करण्यासाठी घेतली जायची व जो भात होईल त्यातील काही खंडी भात हा चिंचवडला श्री मोरया गोसावी महाराजांच्या अन्नसत्रात पाठवला जाई. त्याचबरोबर चिंचोली गावातील मिठागारातून ४ खंडी मीठ चिंचवडला प्रति महिना पाठविले जात असे.
या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जो तलाव आहे तो श्री हळदवणेकर यांचा होता त्यांनी गावच्या लोकांसाठी व पाणीपुरवठ्यासाठी दिला. नारंगीहून भाताचे दळणवळण जास्त होत असे गावचा खर्च व महसूल हा देवस्थानला देण्यात येत असे.